Saturday, April 6, 2013

कर्नाटक विधानसभा चुनाव – 2013...

कर्नाटक असेंब्ली निवडणूक 2013
कुरबर – धनगर समाजाचे राजकीय स्थान
र्नाटक विधानसभा निवडणूक -2013चे बिगुल वाजले आहे. जातीय बेरीज – वजाबाकी चे समिकरणे मांडून राज-गणित समोर ठेवले जात आहेत. र्नाटक राज्यातील राजकारणात लिंगायत आणि वोक्कालिगा जातींचा प्रभाव आहे. गेल्या काही वर्षात कुरबा या तिसर्या मोठया जातीचा शिरकाव यामधे होत आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवित कुरबा समाजाला कॉंग्रेसकडे वळवुन कर्नाटक विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. या पार्श्वभुमिवर कर्नाटक विधानसभा, जातीचे राजकारण, त्यात कुरबर – धनगर समाजाचे स्थान तसेच बेळगाव जिल्ह्यातील कुरबर-धनगर समाजाचे विधानसभीय राजकारणातील स्थान “ याचा शोध-बोध या लेखातून घेतला आहे. कर्नाटक राज्यात 5 मे 2013 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मागील २००८ ची निवडणूक भाजपा – कॉंग्रेस – जेडीएस आणि इतर अशी लढली गेली. येडीयुराप्पांचा भाजप सत्तेवर आला. दक्षिणेवर भाजपाचा हा पहिला विजय होता. ब्राह्मण अनंतकुमार यांना बाजूला सारुन लिंगायत येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले  भ्रष्टाचाराच्या आरोपात मुख्यमंत्रीपदावरून शेवटी पायउतार व्हावे लागले. येडीयुरप्पांच्या मागणीवरूनच वोक्कालिगा सदानंदगौडा मुख्यमंत्री झाले. नंतर त्यांच्याच मागणीवरूनच वोक्कालिगा सदानंदगौडाना खुर्ची सोडावी लागली. कुरबा के ईश्वरप्पाचा सहज पत्ता काटत लिंगायत जगदीश शेट्टर मुख्यमंत्री झाले. एवढे करुनही समाधान न झालेले येडीयुरप्पा शेवटी पक्षाबाहेर पडले. आता येडीयुराप्पांचा कर्नाटक जनता पक्ष आणि श्रीरामलुंचा बी एस आर कॉंग्रेस २०१३ च्या निवडणूक मैदानात नव्याने उतरले आहेत.

कर्नाटक असेंब्ली निवडणूक - 2013
           2004            2008             
पक्ष      जागा    मते%    जागा    मते%      
कॉंग्रेस     65    35.27     80    34.59       
बीजेपी     79    28.33    110    33.86        
जेडीएस    58    20.77     28    19.11        
जेडीयू      5     2.06       -       -
इतर/अपक्ष  17    13.57     6     12.44       

कर्नाटक असेंब्ली निवडणूकीसाठी  25 मे 2008 रोजी मतदान झाले होते, आता 5 मे 2013 रोजी मतदान होत आहे. या मधील कालखंडात बरेच पाणी वाहून गेले आहे. भ्रष्टाचार आणि संधिसाधूपणा हे मुद्दे सर्व प्रस्थापित पक्षीय बनले असल्याने तो आता खर्या अर्थाने निवडणूक मुद्दा बनला जात नाही. आचार संहिता मुळे `प्रचारा` लाच मुसक्या बांधल्याचे दिसते. वर्तमानपत्रे आणि टीवी-केबल यावरील “बातम्या” हेच निवडणूकीचे `प्रमुख प्रचार माध्यम` बनले आहे. मतदार, मतदारांचे ठेकदार यांच्याकडून विविध व्यक्ति, संस्था आणि संघठनांना पैसा आणि आमिषें पुरवली जात आहेत. परंतु तो रोखण्यात निवडणूक आचार संहिता यशस्वी झालेली दिसत नाही. पैसा आणि निवडणूका आता “एकार्थी” झाला आहे.   निवडणूकीतल्या `भ्रष्टाचारा` मधेच देशातील भ्रष्टाचाराचे `मुळ` आहे. परंतु या मुळाला जोपासणार्या व्यवस्थेला धक्का न लावता देशातील भ्रष्टाचार हटणार कसा, हाच हिमालयन प्रश्न आहे. तात्पर्य पैसा आणि माफिया याच्या जोरावर निवडणूका लढविल्या आणि जिंकल्या जात आहेत. हे असे सार्वत्रिक – वास्तविक चित्र संपूर्ण देशभर आहे.

लेखक – सिद्द-सागर, प्रथम प्रकाशन - 31 मार्च 2013... 
दि. 15 एप्रिल 2013 रोजी अरविंद दळवाई यांनी रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून जेडीयू तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. 17 एप्रिल 2013 रोजी सौ. सुरेखा मिडकनट्टी यांनी  रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून रासपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. 20 एप्रिल 2013 रोजी सौ. सुरेखा मिडकनट्टी यांनी पक्षाच्या निर्णयाप्रमाणे रामदुर्ग येथून आपला उमेदवारी अर्ज जेडीयु अरविंद दळवाई यांना पाठिंबा देत माघारी घेतला. 29 एप्रिल 2013: रोजी रासपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटक राज्यास भेट दिली. आलंद – गुलबर्गा येथून जेडीयुच्या अरविंद दळवाई यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मा. जानकर रामदुर्ग – बेळगाव येथे आले. जेडीयु पक्षाच्या अरविंद दळवाई सोबत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली गेली. 30 एप्रिल 2013 रोजी येथील स्थानिक दै. हेसरू क्रांति, दै. होस दिगंत, दै. समतोल पत्रिके आदि वर्तमानपत्रांमधुन संयुक्त पत्रकार परिषदची सदर बातमी प्रसारीत केली गेली. 8 मे 2013 रोजी कॉंग्रेसचे अशोक पट्टण निवडून आले. जेडीयु पक्षाचे अरविंद दळवाई 10343 मते घेवून पराभूत झाले. मुळ लेख 31 मार्च 2013 रोजी प्रकाशित केला होता. त्यानंतर घडलेला घटनाक्रम तारखेवर मांडला आहे. 5 मे 2013 च्या मतदानाने आणि 8 मे च्या निकालाने रामदुर्ग पॅटर्न पुढे नेला की मागे आणला, हे ठरविण्याचे काम रामदुर्गचे मतदार, अरविंद दळवाई आणि वाचकांच्या हाती सोपवित आहोत.
-सिद्द-सागर, दिनांक:15/05/2013


`जात फॅक्टर` ही निवडणूकीच्या राजकारणात महत्वाची मानली जाते. परंतु वास्तव काय आहे? कर्नाटक राज्यात लिंगायत 17% वोक्कलीगा 8% कुरबा 8% मुसलिम 11% एस सी 15% अशी लोकसंख्या असल्याचे सांगीतले जाते. ओबीसी एकूण 65-70 टक्के असल्याचे मानले जाते. तरीही संघठित आणि प्रबल जातीयांचेच भारताच्या आणि कर्नाटकाच्या राजकारणात प्रभाव दिसत आला आहे. अजागृत, असंघठित आणि दुर्बल जातींना `सत्ते` कडे जाण्यापासून लोकशाही भारतात आजपर्यंत तरी रोखले गेले आहे. कर्नाटक राज्यात सुरुवातीला सत्तेच्या राजकारणात लिंगायत जातीचे वर्चस्व होते.
नंतर वोक्कालिगा जातीचा प्रवेश होत गेला. वोक्कालिगा देवेगौडा मुखमंत्री – प्रधानमंत्री झाले. मुस्लिमदलित जातीयांचा आणि त्यांच्या नेत्यांचा वापर केवळ वोट बैंक म्हणून केला जात आहे. कर्नाटक राज्यात लिंगायत आणि वोक्कालिगा नंतर `कुरबा` ही सर्वात मोठी जात मानली जाते. वोक्कालिगा केवळ दक्षिण कर्नाटकमधे तर अनेक जातीत विभागलेला लिंगायत (धर्मिय की पंथिय की जातीय) उत्तर कर्नाटकमधे आढळतात. परंतु कुरबा संपूर्ण राज्यात आढळतो. म्हणूनच कुरबा सर्वात मोठया लोकसंख्येची जात असावी, असे म्हणण्यास जागा आहे. 1931 सालानंतर जनगणना न झाल्याने व जाती संख्येचे वास्तव आकडे समोर आले नसल्याने या म्हणण्यात तथ्य नाही असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. कुरबा सर्वात मोठया लोकसंख्येची जात असो – नसो. परंतु लिंगायत आणि वोक्कालिगा नंतर कुरबांची संख्या मोठी आहे, असे सर्वमान्य मत आहे. अशा कुरबा समाजाचे कर्नाटक राज्याच्या सत्तेच्या राजकारणात काय स्थान आहे ? कर्नाटक विधानसभेत कुरबा समाजाची संख्या घटती आहे. कुरबा समाजाच्या आमदारांची संख्या पूर्वीच्या १४ वरून 2008 साली 6 वर आली आहे. कुरबर समाजात आपले विशेष स्थान प्राप्त करणार्या माजी मंत्री –आमदार एच एम रेवण्णा यांचा बेंगलुरु शहरातून पराभव झाला. कॉंग्रेसतर्फे एच विश्वनाथ 2009 साली बिजेपीचे खासदार श्री विजयशंकर यांचा पराभव करुन खासदार झाले. दोन कुरबा मध्येच येथे लढत झाली. सिद्धरामय्यांचा या बाबतीतला लढा सर्वाना माहित आहे. कोप्पळ येथून के विरुपक्षप्पा यांना तर बेळगाव येथून अमरसिंह पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली. लोकसभा - 2004 साठी विलासराव देशमुख कर्नाटकचे कॉंग्रेस पक्ष निरक्षक होते तर पृथ्वीराज चव्हाण 2009 – लोकसभेसाठी निरक्षक होते. 2008 – विधानसभेसाठी पतंगराव कदम कॉंग्रेसचे बेळगाव जिल्हा निरक्षक होते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

कौन बनेगा मुख्यमंत्री ! सिद्धरामय्या – मल्लिकार्जुन खरगे ?
या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्दरामया होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सिद्दरामया कुरुबा - धनगर समाजाचे आहेत. कर्नाटक राज्यात कुरुबा - धनगर समाजाची संख्या मोठी आहे. परंतु आजपर्यंत या समाजातुन कोणी मुख्यमंत्री पदावर गेलेले नाही. आपले पुत्र कुमारस्वामीला मुख्यमंत्री पदावर बसविनार्या माजी पंतप्रधान देवेगौड़ा आणि सिद्दरामया यांच्यामध्ये याच कारणातुन मतभेद झाले होते. देवेगौड़ानी दोन वेळा सिद्दरामयांना मुख्यमंत्री पदावर जाण्यापासून रोखले. सिद्दरामयांनी जेडीएस सोडली, कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. विरोधी पक्ष नेते म्हणून ते आता कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. भारतामध्ये कुरुबा - धनगर समाजाची संख्या फार मोठी आहे. तरीही लोकशाही भारतात या समाजाची मोठी राजकीय उपेक्षा झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिद्दरामया कर्नाटकातच नव्हे तर सम्पूर्ण भारताच्या दृष्टीने पहिले कुरुबा- धनगर आहेत, जे मुख्यमंत्री पदाच्या केवळ रेसमध्येच नाहीत तर जनतेच्या पसंतीत 1 नंबरला आहेत. सिद्दरामया मास लीडर आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या पठडीतील ओबीसी चलवळीतील एक अग्रणी आहेत. सर्व समाजात त्यांच्याबद्दल आदर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या धुळवडीत ते निष्कलंक आहेत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवित कुरबा समाजाला कॉंग्रेसकडे वळवुन कर्नाटक विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु देवेगौडापासून सिद्धरामय्यांना कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपद हुलकावणी देत आहे. सिद्धरामय्यांना प्रवेश घेतल्यापासून कॉंग्रेस अंतर्गत मोठा विरोध होत गेला. यातून मार्ग काढीत सिद्धरामय्या कॉंग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी पोहोचले. धर्मसिंह – खरगे याना दिल्लीत पाठविण्यात आले. यामुळे सिद्धरामय्यांची कॉंग्रेसमधील वाटचाल सोपी झाली. सिद्धरामय्या केवळ कुरबर नव्हे तर सर्व समाजात लोकप्रिय आहेत. त्यांचे हितशत्रू ही बरेच आहेत. जातीय आहेत तसेच व्यक्तिगत आणि राजकीय विरोधकही आहेत. 2008 च्या निवडणूकी नंतर कुरबर-ओबीसी मते मिळवण्यात अपयश आल्याने कॉंग्रेस सत्तेवर येवू शकली नाही असा आरोप खरगे यांनी सिद्धरामय्या यांना उद्देशुन केला, तेंव्हा सिद्धरामय्या संतप्त झाले होते. तिकिट वाटपावरून 2008 च्या निवडणूकीअगोदर सिद्धरामय्या संतप्त होवून दिल्ली येथील कॉंग्रेस बैठक सोडून गेले. तेव्हा ऑस्कर फर्नाडिस यांनी अक्षरश: विमानतळावर जावुन सिद्धरामय्याना बैठकीस परत नेले होते. परराष्ट्रमंत्रीपद सोडून कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा राज्यात परतले आहेत. मास लीडर सिद्धरामय्या कॉंग्रेस चे स्टार कॅंपेनर आहेत. सत्तेवर कोणता पक्ष येणार हे अजुन गुलदस्त्यात आहे. परंतु कॉंग्रेस सत्तेवर आली तर मुख्यमंत्री कोण बनणार हा कळीचा प्रश्न बनला आहे. कुरबा समाज सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार असे समजून हुरळून गेला आहे. सुवर्णा टीवी तर्फे एक सर्व्हे घेण्यात आला. जनतेची पसंती विचारण्यात आली. तेंव्हा जनतेच्या पसंतीत सिद्दरामया नंबर एक वर असल्याचे दिसले. कर्नाटकच्या आजी - माजी मुख्यमंत्र्यांना सिद्दरामया यांच्यापेक्षा खालची पसंती मिळाली. माजी पंतप्रधान देवेगौड़ा पुत्र कुमारस्वामी तसेच भाजपला सत्ता सोपानावर नेणारे येडीयुरप्पा हे देखील सिद्दरामया यांच्या पेक्षा मागे पडल्याचे दिसते. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सिद्दरामया जनतेच्या पसंतीत नंबर 1ला आहेत हे आज दिसत आहे. परंतु कॉंग्रेसचे राजकारण पसंतीत त्यांना कोणत्या नंबरवर ठेवते, यावरच सिद्दरामया यांचे मुख्यमंत्रीपद ठरणार आहे. निष्टावंताना मुख्यमंत्री करण्याची कांग्रेसची परंपरा आहे. सिद्धरामय्या यात कोठे बसतात, हे फक्त कॉंग्रेस श्रेष्ठीनाच माहीत आहे. सिद्धरामय्या यावेळी कॉंग्रेस तर्फे मुखमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. देवेगौडा आणि जेडीएस तर्फे मानभंग झालेल्या सिद्धरामय्या यांना कॉंग्रेस सत्तेवर येवून मुख्यमंत्री करणार का हाच कर्नाटक राज्याच्या जनतेसमोर विशेषत: कुरबा समाजासमोर “यक्षप्रश्न” पडला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील आणि त्यामधील रामदुर्ग तालुक्यातील सत्तेच्या राजकारणाचा मागोवा घेत वर्तमान तपासण्याचा प्रयत्न या लेखातून केला जाणार आहे.

बेळगाव जिल्हा व धनगर समाज
बेळगाव जिल्ह्यात एकुण 18 विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. बेळगाव जिल्हा कुरबर-धनगर बहुल क्षेत्र आहे. बॅकुड गौड म्हणून सुप्रसिद्ध असणार्या कै. वसंतराव पाटील यांचे बेळगाव आणि कर्नाटक राज्यातील राजकारणात एक वेगळेच महत्व त्याकाळी होते. चिक्कोडी लोकसभा क्षेत्र तसेच रायबाग, कुडची विधानसभा क्षेत्र राखीव करुन वसंतराव पाटील आणि कुरबर-धनगर समाजाचा लोकशाही द्वारे  सत्तेच्या राजकारणाचा दरवाजा बंद केला गेला. महाराष्ट्रातही धनगर बहुल विधानसभा (माण) लोकसभा (पंढरपुर) क्षेत्र राखीव केल्याचे दिसते. विधानसभा निवडणूकीसाठी  2008 साली कॉंग्रेसने एकही कुरबा उमेदवार दिला नाही. भाजपा तर्फेही अरबांवी मधून विवेक पाटील या एकमेव कुरबाला उमेदवारी दिली गेली. कॉंग्रेस तर्फे उमेदवारी नाकारले गेलेल्या माजी आमदार रमेश कुडची यांना जेडीएस ने उत्तर बेळगाव साठी उमेदवारी दिली. रमेश कुडची यांचे शिष्य मानले जाणार्या तसेच जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत मानले जाणार्या फिरोज सेठ यांनी त्यांचा पराभव केला. कर्नाटक राज्य कुरबर संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी कॉंग्रेसकडे निपाणी मधून उमेदवारी मागितली होती. अरबावीं विधानसभा क्षेत्रात भाजपाचे विवेक पाटील यांचा जेडीएस च्या भालचंद्र जारकीहोळी यांनी पराभव केला. कॉंग्रेसचे विरन्ना कौजलगी तिसर्या नंबरला फेकले गेले. भालचंद्र जारकीहोळीनी जेडीएस चा त्याग केला व भाजपात प्रवेश करुन मंत्री झाले. त्यामुळे याच मतदारसंघात डिसेंबर 2008 मधे पोटनिवडणूक झाली. यावेळी विवेक पाटील कॉंग्रेसतर्फे तर भालचंद्र जारकीहोळी भाजपातर्फे लढले. मोठ्या प्रशासकीय सेवेचा त्याग करुन राजकारणात उतरलेल्या कुरबा समाजाच्या अरविंद दळवाई यांना जेडीएस ने उमेदवारी दिली. याप्रकारे अरबावीं विधानसभा क्षेत्रात दोन कुरबा विरुद्ध एक वाल्मीकी असा लढा झाला. भाजपाचे भालचंद्र जारकीहोळी कॉंग्रेसचे विवेक पाटील यांचा आणि जेडीएस च्या अरविंद दळवाई यांचा पराभव करुन मंत्रिपद राखले. कुरबा अमरसिंह पाटील कॉंग्रेस तर्फे एकदा खासदार झाले, दुसर्यांदा पराभूत झाले. चिक्कोडी -रायबाग – कुडची सोडून विवेक पाटील यांना गोकाक मधील अरबावीं विधानसभा क्षेत्रात यावे लागले. याप्रमाणे राजकीय उपेक्षित कुरबा समाजाला परागंदाही व्हावे लागल्याचे दिसते. याप्रकारे 18 विधानसभा क्षेत्रांच्या बेळगाव जिल्ह्यात कुरबा समाजाला कॉंग्रेस तर्फे शून्य, भाजपा व जेडीएस तर्फे प्रत्येकी एक अशी उमेदवारी दिली गेली. अशा प्रकारे बेंगळूर विधानसभेत कुरबा बहुल बेळगाव जिल्ह्यातून एकही आमदार गेला नाही. तात्पर्य, कर्नाटक राज्याच्या सत्तेच्या राजकारणात कुरबा समाजाचे स्थान काय आहे, याचे बेळगाव जिल्हा हे उत्तम उदाहरण ठरते.

रामदुर्ग विधानसभा क्षेत्र...
या पार्श्वभुमीवर 25 मे 2008 रोजी लढवील्या गेलेल्या रामदुर्ग विधानसभा क्षेत्रात एकुण 9 उमेदवार रिंगणात होते. कॉंग्रेस – अशोक पट्टण, भाजप – महादेव यादवाड, जेडीएस – हिरेरेड्डी, बसपा – शंकर मूनवळी असे चार पक्षीय तसेच डॉ. कुलगोड एक स्थानिक मातब्बर - अपक्ष उमेदवार रिंगणात होते. डॉ. कुलगोड सहीत कॉंग्रेस, भाजपा, जेडीएस उमेदवारांनी पैशाचा आणि प्रचाराचा पाउस पाडला. मायावतींच्या कर्नाटक भेटीमुळे बसपाचाही प्रचार होता. कॉंग्रेस, भाजपा, जेडीएस या सर्व पक्षाचे उमेदवार लिंगायत/वाणी होते. या मतदारसंघात लिंगायत/वाणी नंतर कुरबा समाज मोठा आहे. ( 40 हजार पेक्षा जास्त) एम. चंदरगी गावच्या कुरबा समाजातील सौ. सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कप-बशी हे पक्षाचे चिन्ह मिळविले. मर्यादित साधने व पुरेसा पैशा अभावी रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येक गावी त्या केवळ एक वेळ पोहोचू शकल्या. महिला सक्षमीकरण तसेच महिला आरक्षणाची चर्चा, या पार्श्वभुमीवर राजकीय उपेक्षित कुरबा समाजातील एका महिलेला राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी देवुन तशी क्रांति केली होती. कर्नाटक विधानसभेत जावून बसण्याचा मलाही अधिकार आहे, असेच जणू सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी या कुरबा महिलेने या निवडणूकीत संदेश देण्याचे काम केले. लोकांनी त्यांना उस्फुर्त साथ दिली. प्रचार माध्यमानी या क्रांतिची दखल घेतलेली दिसत नसली तरी मतदारानी घेतली होती, असे दिसते. रामदुर्ग विधानसभा निवडणूकीचा निकाल हेच सांगतो. देशाचे पंतप्रधानपद आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगणार्या जेडीएस च्या उमेवाराला, माजी आमदार हिरेरेड्डीना 3500 मते मिळाली होती. देशभरातील वातावरण ढवळणार्या बसपाच्या शंकर मूनवळी या उमेदवाराला 1187 मते तसेच डॉ. कुलगोड सारख्या मातब्बर उमेदवाराला 1955 मते मिळाली असताना राजकीय वारसा, परंपरा तसेच भरपूर साधने – पैसा असणार्या प्रस्थापित राजकीय पक्ष आणि उमेदवारांसमोर सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टीची 2283 मते म्हणजे एक निवडणूक क्रांति होती. परंतु याची नोंद कोणी घेतली नाही. पत्रकारानी घेतली नाही, राजकीय समिक्षकांनी घेतली नाही. दुर्भाग्य म्हणजे कुरबा समाजानेही याची योग्य अशी दखल घेतली नाही. परंतु अरबावी क्षेत्रात पराभव पतकरलेल्या कुरबर समाजाचे अरविंद दळवाई यांनी दाखल घेतल्याचे दिसते. 3 वर्षापूर्वी त्यांची आम्ही भेट घेतली होती आणि रामदुर्गच्या मतांची आकडेवारी त्यांना दाखवली होती. त्यामुळेच ते अरबावी-गोकाक क्षेत्र सोडून रामदुर्गकड़े वळले असावे, असे म्हणण्याला रास्त जागा आहे. प्रशासकीय सत्तेचा आणि त्याद्वारे प्राप्त केली जाणार्या संपत्तीचा त्याग करुन, भ्रष्ट मानले जाणार्या राजकारणात प्रवेश केला असल्याचा दावा करणार्या अरविंद दळवाई यांनी ज्या पक्षाच्या माध्यमातून एवढा मोठा निर्णय घेतला, त्या जेडीएस पक्षानेच रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून अरविंद दळवाई यांना उमेदवारी नाकारली. आणि अरविंद दळवाईना  जेडीएस सोडावी लागली.

मा. महादेव जानकर आणि अरविंद दळवाई यांनी एकत्रितपणे बेळगाव येथील गांधी भवन मधे 20 जानेवारी 2012 रोजी संगोळी रायन्ना स्मृति सभा घेतली होती. त्यानंतर पुढील वर्षी 22 जानेवारी 2013 रोजी बेळगाव येथे संत कनक जयंती आणि विराट कुरबर जागृती सभा घेवून कुरबा समाजाने राजकीय भागीदारी बद्दल सर्वपक्षांविरुद्ध आवाज उठविला. या दोन्ही सभांमागे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या द्वारे गेली 5 वर्षे सातत्याने राष्ट्रवीर संगोळी रायन्नाच्या प्रेरणेने चालविल्या जाणार्या चळवळीचा मोठा वाटा आहे. मा. जानकर व त्यांचे सहकारी 2008 साला पासुन नंदगड – संगोळी - कित्तुर गांवी येत आहेत आणि देशासाठी बलीदान देणार्या संगोळी रायन्नांचा राज्याभिषेक करुन लोकशाही भारतावर राज्य करण्याचा आपलाही अधिकार असल्याचे सांगत आहेत. या चळवळी मधेच सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांच्या उमेदवारीचे “कार्य कारण भाव” आहे, मुळ आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची 2003 साली दिल्लीत पक्षाची नोंद केली. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे 2004 सालापासून कर्नाटक राज्यात लोकसभा – विधानसभा निवडणूका लढविल्या जात आहेत. रामदुर्ग सहित 4 विधानसभा 2008 साली जागा रासपाने लढविल्या. रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून 2008 साली रासपला मिळालेली 2283 मते म्हणजे नोट ला हरवून वोट जिंकू शकते, असे सांगणारा “होकायंत्र” ठरला होता. तसेच भारतीय मतदार – भारतीय लोकशाही यासाठी एक सुचिन्ह ठरावी अशी ही बाब रासपाच्या रामदुर्ग पॅटर्न ने दाखविली होती. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यास कर्नाटकची भूमी सुपिक ठरेल असेच रामदुर्ग पॅटर्न सांगत होता. या पार्श्वभूमीवर रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अरविंद दळवाई यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती रासपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी केली आहे. अरविंद दळवाईना जेडीएस सोडावी लागल्याचे कल्या नंतर
रासपाचे नेतृत्व हाती घेवून नेता बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. आता रामदुर्ग पॅटर्न पुढे जाणार की मागे येणार, हे मात्र रामदुर्गचे मतदार आणि अरविंद दळवाई यांच्या हाती आहे.

लेखन – सिद्द-सागर, प्रथम प्रकाशन - 31 मार्च 2013

No comments:

Post a Comment